About Manovikas Prakashan LLP
मनोविकास – विचारांना दिशा देणारं प्रकाशन
पुस्तकं माणसाला घडवतात, जीवनाला नवा आकार देतात आणि आयुष्य
समृद्ध करतात. म्हणून उत्तमातलं उत्तम, दर्जेदार साहित्य वाचकांच्या हाती पडावं
यासाठी मनोविकास प्रकाशन गेल्या ३५ वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
प्रकाशन विश्वात मनोविकास प्रकाशनाचं वेगळं स्थान निर्माण करणारे
प्रकाशक अरविंद पाटकर हे मूळचे मुंबईचे. गिरणी कामगार चळवळीत ते पूर्णवेळ
कार्यकर्ते होते. डाव्या-पुरोगामी चळवळीने विचारांची बैठक दिली, तिला वाचनाची
जोड मिळाली. हाच धागा पकडून पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
वाचकांकडून मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाने उत्साह आणि आत्मविश्वास वाढला.
त्याच बळावर मग मुंबईत आकाशवाणी आमदार निवासाच्या आवारात आपलं
पुस्तकाचं दुकान थाटलं आणि ते ‘मनोविकास बुक सेंटर’ म्हणून नावारुपाला आणलं.
आज हे बुक सेंटर चोखंदळ वाचकांचं मुंबईतलं हक्काचं ठिकाण बनलं आहे.
पुस्तकं विक्रीतून प्रकाशनाकडे...
पाच वर्षांचा हा यशस्वी टप्पा पार करताना साहित्य तसेच विज्ञान, तंत्रज्ञान,
शिक्षण, समाज, अर्थकारण, संस्कृती अशा अनेक विषयांवरील पुस्तकांची गरज
लक्षात येत होती. ती विचारात घेऊन प्रकाशन व्यवसायात पाऊल टाकण्याचा
निर्णय घेतला आणि अण्णाभाऊ साठे यांच्या लावण्या, गीतं आणि पोवाडे यांचं
संकलन असणारं ‘शाहीर’ हे पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. त्यातूनच १९८४ या वर्षी
‘मनोविकास प्रकाशन’ ही संस्था जन्माला आली.
लेखकांची पिढी घडवणारी संस्था
अर्थात ती जन्माला घालताना समाजाला दिशा देणारी, विकास साधणारी,
वाचकाला अंतर्बाह्य घडवणारी आणि समृद्ध करणारी पुस्तकं आपण प्रकाशित केली
पाहिजेत, ज्यातून मराठी भाषा समृद्ध व्हावी आणि तिचं संवर्धनही व्हावं अशी
भूमिका अरविंद पाटकर यांनी घेतली. ती जपत त्यांनी ‘शाहीर’ नंतर अंधश्रद्धा
2
निर्मूलन, जातीसंस्थेचं उच्चाटन, विज्ञान, मनोविज्ञान, विवेकवाद, मानवी इतिहास,
व्यक्तिगत आणि सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, राजकारण, भारतीय संस्कृती,
पर्यावरण, व्यक्तीमत्त्व विकास, नव्या पिढीची जडण-घडण असे अनेकविध विषय
हताळले. अनेकांना लिहितं करत लेखकांची नवी पिढी घडवण्याचं एक वेगळं
कामही त्यातून मनोविकास प्रकाशन करत आहे.
पुस्तकरूपाने मान्यवरांशी भेट
समाज परिवर्तनाच्या लढ्यात महत्त्वाचे ठरणारे डॉ. बाबसाहेब आंबेडकर
याचं जाती संस्थेचं उच्चाटन यासारखे महत्त्वाचे ग्रंथ नव्या रूपात वाचकांसमोर
आणण्याचं काम मनोविकासने केलं आहे. जगणं समृद्ध करणारं, विचारांना दिशा
देणारं दर्जेदार साहित्य वाचकांच्या हाती दिलं पाहिजे या भूमिकेतून अनेक
नामांकित लेखकांची दर्जेदार पुस्तकं मनोविकासने वाचकांच्या हाती सोपवली
आहेत. त्यारूपाने अनेक मान्यवरांशी वाचकाच्या भेटी घडवण्याचं काम
मनोविकास करत आहे.
ध्यास नवा विवेकी समाज घडवण्याचा
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आरोग्य साक्षर बनवलं, त्यांची वैज्ञानिक
दृष्टी विकसित केली, तर भावी पिढी सुदृढ, सजग आणि विवेकनिष्ठ बनू शकते. हा
विचार अंगीकारत आरोग्यविषयक, विज्ञानविषयक पुस्तकांच्या विविध मालिका
तज्ज्ञांकडून लिहून घेत त्या प्रकाशित करणं हे मनोविकास प्रकाशनाचं वेगळेपण
राहिलं आहे. शालेय अभ्यासक्रमाला पूरक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला पोषक असं
दर्जेदार साहित्य मुलांच्या हाती पडलं, तर निश्चितपणे नव्या पिढीतून जबाबदार
नागरिक घडू शकतील. याच दृष्टिकोनातून त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ, अभ्यासक
अशा अनेक मान्यवर लेखकांकडून विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, संस्कृती,
वैज्ञानिक प्रयोग-शोध, वैज्ञानिक खेळ अशा विषयांवरील पुस्तकं लिहून घेतली.
त्यातून मुलांविषयीच्या पुस्तकांचं एक वेगळं दालन उघडलं गेलं. मनोविकास
प्रकाशनाचं वैशिष्ट्य ठरावं इतकं वैविध्यपूर्ण असं हे दालन असून त्यालाही
3
विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह सामान्य वाचकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला
आहे.
दुसऱ्या पिढीचा कल्पक सहभाग
मनोविकासचा वाढता पसारा लक्षात घेऊन दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून
मुलगा आशिष पाटकर आणि सून रीना पाटकर यांनी कल्पक सहभाग नोंदवत
वाढत्या व्यवसायाचा काही भार आपल्या खांद्यावर घेतला. काळाशी सुसंगत असे
काही बदल करत मनोविकासला नवी ओळख देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचाच
भाग म्हणून सातत्याने नव्या दमाचे लेखक शोधून सामाजिक जाणिवा सखोल,
प्रगल्भ करणारी पुस्तकं प्रकाशित करण्यावर भर दिला. पुस्तक मुखपृष्ठापासून
वाचलं जातं, याचं भान ठेऊन सघन आशयाबरोबरच दर्जेदार देखण्या पुस्तक
निर्मितीवर जोर दिला. तो देताना आत्मचरित्र, चरित्र, आशयघन अनुवाद, वेगळ्या
विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा-कादंबऱ्या, विज्ञान-मनोविज्ञानाबरोबरच
समाजातल्या विविध घडामोडींची गांभीर्यानं दखल घेणाऱ्या लेखन वाचकांसमोर
यावं असा प्रयत्न केला जात आहे.
उत्कृष्ट निर्मितीला वाङ् मयीन दर्जाची जोड
दर्जा आणि उत्कृष्ट निर्मिती या गोष्टींबरोबरच सतत हटके, नवं काही देण्याचा
प्रयत्न मनोविकासकडून आवर्जून केला जातो, हे मनोविकासचं खास वैशिष्ट्य
म्हणावं लागेल. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान लाभलेल्या सर विश्वेश्वरय्या यांचं
चरित्र कुठेच उपलब्ध नव्हतं. मनोविकासने ते अट्टहासाने लिहून घेतलं आणि “द्रष्टा
अभियंता सर विश्वेश्वरय्या” या पुस्तकाची दर्जेदार निर्मिती करत एक मोलाचा ग्रंथ
वाचकांच्या हाती दिला. त्याच पद्धतीने ‘कहाणी मानवप्राण्याची’, ‘वारूळ पुराण’,
‘ऐवजी’, ‘द्रष्टा अणुयात्रिक डॉ. अनिल काकोडकर’, ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे –
जीवन व कार्य’, ‘शिवपुत्र राजाराम महाराज’, ‘आदिवासींच्या बोधकथा’,
‘मुसाफिर’, ‘भंगार’, ‘हिंदुराष्ट्रवाद’, ‘रॉ – भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा’,
4
‘प्रोपगंडा’, ‘देशभक्त – अंधभक्त’, ‘उद्या’, ‘कॉर्पोरेट कल्लोळ’, ‘सिंफनी’, ‘ग्रेटाची
हाक तुम्हाला ऐकू येतेय ना’ अशा अनेक पुस्तकाची निर्मिती केली गेली आहे.
वैशिष्ट्य
- वैविध्यपूर्ण विषयांची हताळणी आणि नव्या दमाच्या लेखकांचा शोध
- अचून आणि सखोल संपादनावर भर देणारी विषयानुसार तज्ज्ञ
संपादकांची टीम.
- दर्जेदार निर्मिती आणि महाराष्ट्रभरात वितरणाचं जाळं असणारी प्रकाशन
संस्था.
- छापील पुस्तकांबरोबरच ई-बुक्स, ऑडिओ बुक्स अशा नव्या माध्यमातही
काम.
- गेल्या 35 वर्षात 1500 हून अधिक टायटल्स वाचकांच्या हाती सोपवली.
पुरस्कारांची मोहोर
मनोविकास प्रकाशनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण कामावर महत्त्वाच्या अनेकविध
पुरस्कारांची मोहोर उमटली आहे.
- प्रकाशन व्यवसाय क्षेत्रात मानाचा समजला जाणार वि. पु. भागवत
पुरस्कार.
- दिल्लीच्या ‘फेडरेशन ऑफ इंडीयन पब्लिशर्स’चा उत्तम ग्रंथ निर्मिती
पुरस्कार.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्तम ग्रंथ निर्मितीसाठीचा पुष्पा पुसाळकर
पुरस्कार 2018.
- उत्तम ग्रंथ निर्मितीसाठी दिलं जाणारं धनंजय बाळकृष्ण ठवले पारितोषिक
2003.
- अखिल भारतीय प्रकाशनक संघाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी दिला
जाणारा पुरस्कार 2003 आणि 2013.
5
- राज्य शासनाच्या उत्कृष्ठ वाङ् मय निर्मिती पुरस्काराने मनोविकासच्या
अनेक पुस्तकांचा सन्मान.
विशेष म्हणजे आजही हा सिलसिला सुरूच आहे. म्हणूनच मराठी प्रकाशन
विश्वात मनोविकास प्रकाशन हे चोखंदळ वाचकांचं एक महत्वाचं, हक्काचं
डेस्टिनेशन बनलं आहे.